मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून लुटणारी प्रीती दास हिच्याबद्दल ‘ महत्वाची ‘ बातमी

शेअर करा

ब्लॅकमेलर लेडी डॉन प्रीती दासचे एक एक कारनामे बाहेर येत असल्याने तिच्या ह्या गुन्ह्यात तिची साथ देणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहे . लुटेरी दुल्हन तसेच ब्लॅकमेलर लेडी डॉन अशी विशेषणे लाभलेल्या प्रीती दास हिला तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे . प्रीती दास हिच्याविरुद्धच्या सर्व प्रकरणांचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून प्रीतीच्या चौकशीत बऱ्याच मोठ्या मोठ्या नावांचा खुलासा होण्याची चिन्हे आहेत . पाचपावली, जरीपटका, लकडगंज आणि सीताबर्डी पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत. कारागृह प्रशासनाने करोना चाचणी केल्यानंतर तिचे कोठडीत विलगीकरण करण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी प्रकरणांचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला.

ब्लॅकमेलर प्रीती दास तिच्याविरुद्धच्या तक्रारींचा ओघ सुरूच असून २० जूनपर्यंत ती पाचपावली पोलिसांच्या ताब्यात होती. तिची पोलीस कोठडी संपताच न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिची कारागृहात रवानगी केली. तिच्याविरुद्ध दाखल गुन्ह्य़ांचा तपास पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर, उपनिरीक्षक राजकुमार त्रिपाठी आणि दोन महिला अधिकारी करीत आहेत.

प्रीती दास हिने आतापर्यंत कित्येक जणांची फसवणूक केलेली असून ब्लॅकमेलिंगचे एक संपूर्ण रॅकेट तिने उभे केले होते . जरीपटका पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध एकाला २५ हजारांनी लुबाडण्याचा गुन्हा दाखल आहे. तिने भरोसा सेलच्या नावाखाली एका व्यक्तीला धमकावून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजार उकळले होते, अर्थात हा फक्त एक गुन्हा असून आणखी देखील काही लोक आता पुढे येऊ लागले आहेत .

प्रीती दासवर सीताबर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे, पाचपावली, लकडगंज, जरीपटका आणि भंडारा जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत. प्रीती दासने गंडा घालण्यासाठी तसेच वसुली करण्यासाठी डुबऱ्या अमित, पत्रकार शीतल, प्राजक्‍ता बंगाली, रवी आणि शारीर ट्रेलर अशी ब्लॅकमेलर गॅंग बनविली होती. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांच्या मार्गदर्शनात संबंधिताने तक्रार दिली होती .

प्रीती दासच्या ह्या टोळीने आतापर्यंत शेकडो धनिकांना जाळ्यात ओढले आणि खंडणी स्वरूपात लाखो रुपये उकळले. प्रीती दासची टोळी गुन्हे दाखल होईपर्यंत तिच्यासोबत होती मात्र आता टोळीतील सर्व पंटर गायब झाले आहेत .प्रीती कायद्याच्या कचाट्यात अडकताच तिच्या सर्व पाठीराख्यानी तिची साथ सोडली आहे त्यामुळे तिने, ” हम तो डुबेंगे सनम तुमको भी लेकर ” अशा खास शब्दात फोनवर तिच्या पाठीराख्यांना धमकी दिल्याची देखील चर्चा आहे . कित्येक राजकीय पदाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना प्रितीने आपल्या कौशल्याने आपल्या जाळ्यात ओढले होते. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून लाखोंनी लुटल्याचे समोर आले आहे. मात्र, प्रीतीकडे फोटो आणि व्हिडिओ असल्याने इभ्रतीचा “भाजीपाला’ होऊ नये म्हणून कोणताही राजकीय पदाधिकारी आणि पोलिस अधिकारी प्रीतीच्या ब्लॅकमेलिंगबाबत शब्दही बोलायला तयार नाही इतकेच काय तर इलेक्ट्रॉनिक मीडिया देखील ह्या विषयावर जास्त बोलायला तयार नाही .

सुनील पौनीकर या युवकाच्या पत्नीला देहव्यापारात ढकलून धंदा करवून पैसे वसूल करेल अशी धमकी प्रीतीने चक्क दोन पोलिसांच्या उपस्थितीत दिली होती. हा अपमान सहन न झाल्याने पौनीकरने आत्महत्या केली. याप्रकरणी तब्बल सहा महिन्यानंतर प्रीतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा लकडगंज पोलिसांनी दाखल केला होता. मात्र, आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना प्रीती दासला लगेच जामीन मिळाल्याने पोलिस आणि सरकारी वकिलाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. लकडगंज पोलिस “मॅनेज ‘ झाल्याची चर्चा शहरभर आहे.


शेअर करा