मयत असलेला झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय रोज पार्सल घेऊन जायचा , पोलिसांनी केली अटक

सोशल मीडियावर सध्या एक जोरदार चर्चा सुरू असून झोमॅटोवरील फूड डिलिव्हरी करणारा एक बॉय चक्क मयत असल्याची माहिती समोर आलेली आहे. मयत असलेला हा व्यक्ती चक्क पंधरा ते वीस जणांना रोज फूड डिलिव्हर करत होता. उत्तर प्रदेशातील झाशी येथे हा प्रकार समोर आला असून या तरुणाची हत्या झालेली होती असे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे होते. त्याचा खून झाल्यानंतर सदर प्रकरणात काही आरोपींना अटकही करण्यात आली होती मात्र तो तरुण झोमॅटो इथे डिलिव्हरी करत असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, जिया उर रहमान असे या व्यक्तीचे नाव असून तो फतेहपुर येथील रहिवासी आहे. 2001 साली उन्नाव येथील सुफिया खातून नावाच्या महिलेसोबत त्याचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगाही असून लग्न झाल्यानंतर त्यांच्यात वादविवाद सुरू झाले त्यानंतर सुफिया हिने त्याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केला. त्याला कंटाळून तो घरातून पळून गेला आणि झाशी येथे जाऊन त्याने झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉयची नोकरी सुरू केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रहमान हा बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या आईने आपल्या मुलाचा खून झालेला असावा अशी शंका व्यक्त करत पोलिसात फिर्याद दाखल केली होती. तीन महिन्यापूर्वी कोर्टाच्या आदेशानंतर सून आणि तिच्या कुटुंबियांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर प्रकरणाचा पोलिस शोध घेत होते तर दुसरीकडे कुटुंबीयांनी मात्र त्याचा मृत्यू झालेला आहे अशी समजूत करून घेतलेली होती. मयत व्यक्तीच्या मुलाला आपले वडील कुठे आहे याचा सुगावा लागला त्यानंतर त्याने पोलिसांना फोन करून ही माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.