अहमदनगर मनपाच्या कृपेने ‘ पे अँड पार्क ‘ , नगरकरांनो आता खिसे मोकळे करा

शेअर करा

अहमदनगर महापालिकेने शहरातील तब्बल 36 रस्त्यांवर पे अँड पार्क व्यवस्था सुरू करण्याच्या उद्देशाने एका खाजगी संस्थेची नियुक्ती केलेली आहे. नाशिक येथील या संस्थेला पाच वर्षांसाठी पे अँड पार्कचा ठेका देण्यात आलेला असून 21 लाख 75 हजार रुपये इतके उत्पन्न महापालिकेला पाच वर्षात मिळणार आहेत. एका अर्थी तब्बल 36 रस्ते महापालिकेने खाजगी संस्थेच्या हवाली केलेले असून नगरच्या खड्डेमय रस्त्यांमध्ये आता पार्किंगसाठी देखील नगरकरांना पैसे मोजावे लागणार आहेत. पे अँड पार्कमध्ये पार्क केलेली गाडी जर चोरीला गेली तर त्याची जबाबदारी कुणाची याविषयी स्पष्टता मात्र नाही. 

दुचाकीसाठी प्रति तासाला पाच रुपये चार , चाकीसाठी प्रति तासाला दहा रुपये असे शुल्क वेगवेगळ्या गाड्यांसाठी निश्चित करण्यात आलेले असून टेम्पोसाठी पंचवीस रुपये , मिनीबस पन्नास रुपये , अवजड वाहनांसाठी 120 तर इतर वाहनांसाठी त्याहीपेक्षा जास्त अशी रक्कम आकारण्यात येणार आहे सोबतच जीएसटीचा देखील बोजा नागरिकांच्याच माथी मारण्यात येणार आहे. 

नो पार्किंगमध्ये गाडी उभी केल्यास दुचाकी टोईंगसाठी 742 चार्ज , दुचाकी क्लिपिंग पाचशे रुपये , चार चाकी टोइंग 984 इतके शुल्क व त्यावर जीएसटी इतका भार नगरकरांच्या खांद्यावर टाकला जाणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ज्या 36 रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले त्यात अनेक रस्त्यांवर कधी फारशी गर्दी देखील नसते आणि पार्किंगची देखील कुठली समस्या कधी झालेली नाही मात्र तिथे देखील आता पार्किंगसाठी पैसे आकारण्यात येणार आहेत.


शेअर करा