शेती कसण्यास जाण्यासाठी असलेला रस्ता अतिक्रमण करून अडवला आणि त्यानंतरही रस्ता खुला केला जात नसल्याच्या निषेधार्थ दौंड मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात एका शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. भावकीवरून हा वाद सुरू झालेला होता त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.
उपलब्ध माहितीनुसार , सतीश महादेव जगदाळे ( वय 45 वर्ष राहणार लिंगाळी तालुका दौंड ) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून महादेव जगदाळे यांची माळवाडी परिसरात शेतजमीन आहे. त्यांचा संभाजी रामचंद्र जगदाळे यांच्यासोबत वाद असून नऊ नोव्हेंबर 2023 रोजी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिलेले होते.
तहसीलदार यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मंडळ अधिकारी धनंजय गाडेकर टाळाटाळ करत असल्याचा दावा करत सतीश जगदाळे यांनी सामुहिक आत्मदहन करण्याचा लेखी इशारा 28 एप्रिल रोजी दिलेला होता. गुरुवारी आठ तारखेला सतीश जगदाळे यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पुढील अनर्थ टाळला. पाच ते सहा दिवसात रस्ता खुला होईल असे आश्वासन तहसीलदार अरुण शेलार यांनी पुन्हा एकदा दिलेले आहे.