कलाकेंद्रात काम करणाऱ्या महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन काही वर्षांपासून बदलला असला तरी अद्यापही या महिलांना असंख्य अडचणीचा सामना करावा लागत आहे . असाच एक प्रकार पांढरी पुलावरील खोसपुरी परिसरात समोर आलेला असून चक्क जोरजबरदस्ती करत ‘ आम्हाला पार्टी लावायची आहे ‘ असे म्हणत काही तरुणांनी महिलांना त्रास दिला. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे संबंधित महिलांनी तक्रार निवेदन देऊन तक्रार केली आहे.
निवेदनात म्हटलेले आहे की ,’ सदर कला केंद्रात महिला नृत्याचे काम करतात. चार मे 2025 रोजी रात्री बारा ते एकच्या सुमारास काही मद्यधुंद अवस्थेतील तरुण तिथे आले आणि त्यांनी आम्हाला आत्ताच पार्टी लावायची आहे आमची पार्टी लावा ,’ असे सांगितले.
महिलांनी त्यांना आता कला केंद्र बंद झालेले आहे याची माहिती दिली मात्र त्यानंतर त्या तरुणांनी महिलांना अपशब्द वापरत शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर देखील सुमारे 10 जण दुचाकीवरून हातात तलवार काठ्या आणि गज घेऊन आले आणि पुन्हा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर ऐवज लुटून फरार झाले. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली असून लवकरात लवकर तरुणांना अटक करण्यात यावी अन्यथा आमच्या जीविताला धोका आहे असे या निवेदनात म्हटले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अक्षय चेमटे , सचिन दराडे आकाश दराडे या तीन जणांच्या विरोधात त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.