उच्चभ्रू कुटुंबातील महिला रोख व दागिने घेऊन प्रियकरासोबत पसार; मुलीला दिले माहेरी सोडून…

शेअर करा

नागपूर : घरातील रोख व दागिने घेऊन विवाहिता पसार झाली. ती मित्रासोबत पळून गेल्याची तक्रार पतीने नोंदविली. त्याआधारे गणेशपेठ पोलिसांनी पत्नी व मित्राविरुद्ध विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला आहे. गुंजन (३०) व गिरीश कटारा (३०) रा. जयपूर, राजस्थान अशी आरोपींची नावे आहेत. संदीप (३४, रा. गंजीपेठ) असे या प्रकरणातील तक्रारदाराचे नाव आहे. संदीप हे संयुक्त अरब अमिरात येथे शोभा कंन्स्ट्रक्शन कंपनीत पर्यवेक्षकपदी कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या अजमेर येथील एका लग्नसोहळ्यात संदीप व गुंजनची ओळख झाली होती. दोघांच्याही पालकांच्या संमतीने लग्न जुळले. त्यानंतर अगदी रितीरिवाजाप्रमाणे लग्न सोहळा पार पडला. लग्नात संदीपने तिला सोन्याचे दागिने दिले होते. त्यांना सहा वर्षांची मुलगीसुद्धा आहे. संदीप अधिकाधिक वेळ कामाच्या ठिकाणीच रहायचे आणि अधून मधून घरी येत होते.

गुंजनची लग्नापूर्वीपासूनच गिरीशसोबत ओळख होती. लग्नानंतरही गुंजन व गिरीशच्या भेटीगाठी सुरूच होत्या. जानेवारी २०१९ मध्ये गुंजनने तिच्याकडील दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले. संदीप नागपूरला परतला असता ही बाब समजली. त्याने जाब विचारत राग व्यक्त केला.

तिच्या आई-वडिलांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनीच दागिने सोडवून आणून दिले. १३ सप्टेंबर २०२० रोजी संदीप घरी नसताना ती घरातील ४० हजार रुपये रोख व ४.८० लाख रुपये किमतीचे दागिने व मुलीला घेऊन अजमेरला गेली. मुलीला माहेरी सोडल्यानंतर गिरीशसोबत पसार झाली.


शेअर करा