विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील आयसीयू विभागात आग, तब्बल इतके जण दगावले

शेअर करा

वसई : दोन दिवसांपूर्वीची नाशिकची ऑक्सिजन टाकी लीक झाल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता वसई- विरारच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. हॉस्पिटलला लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

पालघर जिल्ह्यातील वसई-विरारच्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये ही आग लागली. कोविड सेंटरमध्ये ही आग लागली आहे. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वसई विरार महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रुमकडून सांगण्यात आले आहे. अन्य रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे.  

विरारमधील तिरुपती नगरातील बंजारा हॉटेलच्या मागे विजय वल्लभ हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदभता विभागात (ICU) मध्यरात्री तीनच्या सुमारास आग लागली. वॉर्डात ऑक्सिजन असल्यानं आग लगेचच सर्वत्र पसरली. त्यामुळं एकच गोंधळ उडाला. आगीची घटना घडली तेव्हा आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ हालचाली करून काही रुग्णांना वाचवले. मात्र, १३ रुग्णांचा मृत्यू झाला. यात पाच महिला रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती वसई-विरार महापालिकेनं दिली आहे. काही तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. रुग्णालयातील इतर रुग्णांना दुसरीकडं हलवण्यात आलं आहे.


शेअर करा