नगर महापालिका आयुक्तांचा पहिला ‘ बदली बॉम्ब ‘ याच विभागावर, तब्बल इतक्या कर्मचाऱ्याच्या बदल्या

शेअर करा

महापालिकेतील नगररचना विभागात वर्षानुवर्ष एकाच टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या एकाधिकारशाहीला आयुक्त शंकर गोरे यांनी अखेर सुरुंग लावला आहे . आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नगररचना विभागातील तब्बल सहा तर अन्य विभागातील 5 अशा एकूण अकरा कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली. मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी हा धडाडीचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचे नगर शहरात कौतुक केले जात आहे आणि सामान्य नागरिकांची आता नवीन कर्मचारी तरी वेळेत कामे करतील अशी आशा केली जात आहे.

नगर महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच टेबलावर बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एकाधिकारशाही वाढत होती, त्यातून नागरिकांचे फिल्डिंग लावून होणारे शोषण याविरोधात दैनिक लोकमत यामध्ये वृत्तमालिका छापून आली होती. नगर चौफेरने देखील कित्येकदा महापालिकेत नागरिकांच्या होणाऱ्या पिळवणुकीबद्दल आवाज उठवला होता. अखेर आयुक्त गोरे यांनी अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणार असल्याचे सांगितले होते, त्यानुसार गोरे यांनी नागरिकांचे सर्वाधिक शोषण करणाऱ्या नगररचना विभागापासूनच बदल्यांना सुरुवात केली आहे.

नगररचनाचे सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांच्यासह इतर अधिकार्‍यांची आयुक्तांनी बैठक घेतली. दुपारी सुरू झालेली ही बैठक संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती. आयुक्त गोरे यांनीही बैठकीत आक्रमक पवित्रा घेतला. नगर रचना विभागातील सहा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा प्रस्तावावर स्वाक्षरी करत तात्काळ हजर होण्याचा आदेश दिला आहे. झालेली बदली रद्द करण्याबाबत देखील कुठलाही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर महापालिका अधिनियम कलम 56 नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही गोरे यांनी दिला आहे .बदल्या करताना कामकाज ठप्प होणार नाही याचीही काळजी घेण्यात येत असून कामाच्या सोयीनुसार बदल्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे .

महापालिकेतील नगररचना, बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत, आस्थापना यासह अन्य विभागातील कर्मचारी वर्षानुवर्षे त्याच टेबल वर काम करत असल्याने या कर्मचाऱ्यांची एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होत असून अगदी किरकोळ कामासाठीसाठी देखील नागरिकांना महापालिकेत हेलपाटे मारावे लागतात, शिवाय पद्धतशीरपणे फिल्डिंग लावून वरिष्ठपासून कनिष्ठपर्यंत संगनमत करून नागरिकांचे आर्थिक शोषण केले जाते ही बाब वेगळीच. सेवानिवृत्त नागरिकांसह इतर नागरिकांना देखील महापालिकेचे खराब अनुभव दररोज येत असतात. कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून भागणार नाही तर त्यांना फॉर असणारे वरील अधिकारी देखील बदलणे गरजेचे आहे याची नोंद देखील आयुक्तांनी घेणे गरजेचे आहे .

कुणा कुणाच्या झाल्या बदल्या ?

नगररचना विभागातील ट्रेसर सतीश दारकुंडे यांची नगररचना विभागातून बांधकाम विभागात बदली करण्यात आली आहे. लिपिक टंकलेखक संजय चव्हाण यांची नगर रचना विभागातून प्रभाग समिती क्रमांक 4 मध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी प्रभाग समिती क्रमांक 4 मधील शिवराम गवांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लिपिक सुनील खलचे यांची नगर रचना विभागातून सावेडी प्रभाग कार्यालयात बदली करण्यात आली आहे. खलचे यांच्या जागी सावेडी प्रभाग कार्यालयातील देवराम पिचड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लिपिक मोहन ढवळे यांची नगर रचना विभागातून स्थानिक संस्था कर विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी स्थानिक संस्था कर विभाग किशोर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लिपिक राजेंद्र फडतरे यांची नगर रचना विभागातून प्रभाग समिती क्रमांक 3 मध्ये बदली करण्यात आली आहे . त्यांच्याजागी प्रभाग समिती क्रमांक 3 मधील राहुल झिंजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिपाई राधा आहेर यांची नगर रचना विभागातून माहिती सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी माहिती सुविधा केंद्रातील शिपाई पदावर कार्यरत असलेल्या उज्वला महारपुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त शंकर गोरे म्हणाले काय म्हणाले ?

महापालिकेतील वर्ग 3 आणि 4 मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. सोमवारी नगररचना विभागातील कामकाजाचा आढावा घेऊन सहा कर्मचाऱ्यांच्या अन्य विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत. अन्य बांधकाम , पाणीपुरवठा , विद्युत , आस्थापना , सामान्य प्रशासन आदी विभागांचा आढावा घेऊन कामाच्या सोयीनुसार बदल्या करण्यात येणार आहेत. बदल्या करताना कोणतेही कामकाज ठप्प होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे


शेअर करा