‘ गर्लफ्रेंड हवी आहे ‘ म्हणून आमदाराला लिहलेल्या पत्रामागचे धक्कादायक सत्य आले समोर

मुलगी पटत नाही, गर्लफ्रेंड हवी आहे यासाठी चक्क लव्ह गुरूचा सल्ला घेतल्याच्या अनेक घटना रोज उघडकीस येत असतात मात्र चंद्रपूर येथील एक तरुणाने चक्क आमदाराला पत्र लिहून गर्लफ्रेंड हवी असल्याची एक बातमी काल तुफान व्हायरल झाली होती मात्र त्याचे हे पत्र आमदारांपर्यंत पोहचलेच नसल्याचे समोर आले आहे. बातमी व्हायरल झाल्यावर आमदारांच्या कार्यकर्त्यांनी सदर तरुणाला शोधून काढले आणि त्यानंतर या पत्रामागील खरे सत्य बाहेर आले. तो तरुण आता सर्वांसमोर आला असून गर्लफ्रेंडसाठी आमदाराला लिहिलेल्या त्या पत्राबाबत त्याने धक्कादायक खुलासा केला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , ज्या तरुणाच्या नावाने हे पत्र लिहिण्यात आलं त्यालाच या पत्राबाबत काही कल्पना नव्हती. त्याच्या मित्रांनी हा सर्व प्रताप केला होता. त्याच्या मित्रांनी अशी कबुली दिली आहे तसेच त्या तरुणाने आमदारांची माफीही मागितली आहे. भूषण असे या तरुणाचे नाव असून त्याच्या मित्रानी त्याला माहित नसताना हा सर्व प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. चंद्रपुरातील भूषण जांबुवंत राठोडच्या नावाने विधानसभा क्षेत्रातील आमदार सुभाष धोटे यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होत. आमदार सुभाष धोटे आपल्याला वडीलधारे असून त्यांना त्रास देण्याचा कुठलाही विचार नसल्याचे भूषण आणि मित्रांनी स्पष्ट केले असून त्यांनी याबद्दल माफी देखील मागितली आहे.

काय होत या पत्रामध्ये लिहलेलं ?

‘ माननीय आमदार साहेब संपूर्ण तालुक्यात भरभरून मुली आहेत. पण मला एकही मुलगी पटत नसून ही चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेडेगावातून असून राजुरा-गडचांदूर इथं रोज जाणं येणं करतो. परंतु मला एकही मुलगी पटत नाही. दारू विकणाऱ्याला आणि काळ्या डोमड्यांना गर्लफ्रेंड असते, ते बघून माझा जीव जळून राख होतो. राजुरा विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहित करायला हवं, आमच्यासारख्यांनासुद्धा भाव देण्यात यावा ‘ असा मजकूर असलेले हे पत्र काल सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.