जामखेड रोडवर निंबोडीजवळ पुन्हा दुर्घटना , एका महिलेने गमावले प्राण

शेअर करा

नगर जामखेड रोडवर निंबोडीजवळ याआधी देखील अनेक अपघात झालेले असून पुन्हा एकदा अशीच एक दुर्दैवी घटना निंबोडीजवळ घडलेली आहे. जामखेडवरून नगरकडे येणाऱ्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पिकअप चालकाने एका दुचाकीसह रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या महिलांना जोरदार धडक दिलेली असून या धडकेमध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे तर चार जण गंभीर जखमी झालेले आहेत . जखमी व्यक्तींमध्ये एक महिला, एक तरुण आणि एका लहान मुलाचा देखील समावेश आहे.

उपलब्ध माहितीनुसार, वत्सला भानुदास चांदणे असे मयत महिलेचे नाव असून इतर जखमी व्यक्तींवर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत . परिसरातील नागरिकांनी पिकअप चालकाला पकडले त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला . या आधी देखील अशाच स्वरूपाच्या घटना निंबोडीजवळ घडलेल्या आहेत.

नगर-जामखेड रोडवरील निंबोडी गावाजवळ हा पिकअप चालक आलेला असताना त्याने समोरून येणारी दुचाकी आणि महिलांना जोरदार धडक दिली . गावातील नागरिक एकवटले आणि त्यांनी या पिकअप चालकाला जोरदार चोप दिला. पोलिसांनी अखेर नागरिकांच्या तावडीतून त्याची सुटका केली आणि त्यानंतर त्याला अटक केली.


शेअर करा