चक्क आरटीओ कार्यालयाचा बनावट लोगो लावून खाकी गणवेश घालत वाहन चालकाकडून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटरवाहन निरीक्षक सुनील पाटील यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिलेल्या असून बीड जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादी व्यक्ती त्यांच्या मालकीचा ट्रक घेऊन जात असताना पाथर्डी तालुक्यातील देवराई येथे त्यांच्या पाठीमागे आरटीओचा लोगो लावलेली एक जीप आली आणि तुझ्या गाडीच्या फिटनेस सर्टिफिकेटची मुदत संपलेली आहे. 64 हजार रुपये दंड भरावा लागेल अशी त्यांना धमकी दिली त्यानंतर 25 हजारांवर आरोपींनी तडजोड केली मात्र संशय आल्यानंतर फिर्यादी यांनी मोटरमालक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब सानप यांच्याशी संपर्क केला.
बाबा सानप यांच्याशी संपर्क झाल्यानंतर आरोपींपैकी एकाने आपण वडाळा आरटीओ कार्यालयातून सूर्यवंशी बोलत आहे असे सांगितले त्यानंतर सानप यांनी यासंदर्भात कार्यालयाशी संपर्क केला त्यावेळी तिथे सूर्यवंशी नावाचा कोणी अधिकारी नसल्याची माहिती मिळाली त्यानंतर दोन्ही जणांच्या विरोधात पाथर्डी पोलिसात फिर्याद देण्यात आली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींची नावे अजय गाडगे आणि दिनेश धनवर असल्याचे समोर आलेले आहे. खोटी नावे धारण करून लुटण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता.