नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा मिळेल अशी कुठलीही घटना गेल्या आठ दिवसात समोर आलेली नसून आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी स्वीकारल्यानंतर तपासाची गती वाढलेली दिसून येत नाही . ‘ सदर प्रकरणातील संचालक आणि कर्जदार यांना पिंजरे लावून पकडा ‘ असा खोचक सल्ला न्यायालयाने दिल्यानंतर देखील तपासाची गती थंडावली असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या आक्रमक कार्यशैलीसाठी जिल्ह्याला परिचयाचे असणारे संदीप मिटके यांच्याकडे पदभार आल्यानंतर ठेवीदारांना न्याय मिळण्याची आशा आहे .
न्यायालयाने सदर प्रकरणी पोलिसांची चांगलीच कानउघाडणी करत ‘ 105 आरोपींपैकी आत्तापर्यंत फक्त पाच आरोपी तुम्ही कोर्टापुढे अटक केले आहेत बाकीचे कुठे आहेत ? ‘ असा खडा सवाल विचारलेला होता त्यावर समाधानकारक उत्तर न आल्याने न्यायालयाने ‘ आरोपींना रात्री पिंजरे लावून पकडा ; असेही पोलिसांना सांगितले होते सोबतच ‘ तहसीलदार यांच्याकडून संचालक आणि कर्जदार यांच्या मालमत्तेचा तपशील जमा करा. तुमच्याकडे काही सल्ला देणारे व्यक्ती आहेत का नाही ? ‘ असे देखील विचारले होते. पोलिसांकडून त्यावेळी तपासी अधिकारी बदललेले असल्याकारणाने आज न्यायालयात आलेले नाहीत असे सांगण्यात आलेले होते मात्र तपासी अधिकारी बदलून देखील न्यायालयासमोर म्हणणे मांडण्यासाठी निदान दाखवण्यासाठी का होईना आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडून कुठलीही मोठी कारवाई करण्यात आलेली नाही.
उद्या 13 तारखेला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखा येथे ठेवीदारांचे जबाब नोंदवण्यात येणार असून सकाळी साडेदहा वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जमण्याचे आवाहन नगर अर्बन बँक बचाव कृती समितीकडून करण्यात आलेले आहे. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये हा घोटाळा दीडशे कोटींचा नव्हे तर 291 कोटींचा असल्याचे समोर आल्यानंतर अनेक अनेक संचालक आणि कर्जदार हे फरार झालेले आहेत. तपासी अधिकारी हरीश खेडकर यांच्यानंतर हा तपास आता संदीप मिटके करत असून ’ केवळ ठेवीदारांचे जबाब नोंदवून त्यांना ठेवी परत मिळणार आहेत की ठेवीदारांना फक्त जबाब नोंदवण्याच्या बहाण्याने बोलावून त्यांचे म्हणणे आम्ही ऐकून घेतलेले आहे ‘ इतकेच म्हणणे न्यायालयासाठी तयार ठेवण्यात येईल , अशी देखील शक्यता दिसून येत आहे.
नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी आरोपींची संख्या एकूण 105 असून विशेष म्हणजे यामध्ये आरोपी क्रमांक 105 वर एका सॉफ्टवेअर कंपनीचा समावेश आहे . सदर सॉफ्टवेअर कंपनीने अर्बन बँकेतील गैरव्यवहाराबाबत बॅक डेटेड एन्ट्री करण्याची ‘ अनोखी ‘ सुविधा घोटाळेबाजांना दिलेली होती त्यामुळे त्यांना मोकळे रान मिळाले आणि सॉफ्टवेअरमध्ये देखील छेडछाड करून हा सर्व घोटाळा करण्यात आलेला आहे. नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींची संख्या एकूण 105 असून आरोपींची लिस्ट सोशल मीडियावर देखील जोरदार व्हायरल झालेली आहे. पहिल्या सहा आरोपींमध्ये दिवंगत भाजप नेते दिलीप गांधी यांच्या कुटुंबीयांशी संबंधित व्यक्तींचा समावेश असून अटकेत असलेल्या आरोपींचा देखील या लिस्टमध्ये समावेश आहे.
सदर चार पानाच्या लिस्टमध्ये संचालक मंडळ , त्यांचे नातेवाईक तसेच नातेवाईकांना कुठल्या स्वरूपाचा फायदा झालेला आहे हे देखील नमूद केलेले असून त्यामध्ये काहींची वैयक्तिक नावे आहेत तर काही कंपन्यांना देखील रकमेचा गैरविनियोग केल्याप्रकरणी आरोपींमध्ये सामील करण्यात आलेले आहे . सर्व आरोपींनी मिळून एकमेकांच्या साथीने संगनमताने हा गैरव्यवहार केल्याचा आरोप नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी यांनी केलेला आहे.