‘ काय कमवायचे आणि काय खायचे ? ‘ सीएनजी तब्बल सहा रुपयांनी महागले

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत होती मात्र आता ही वाढ होण्याचे प्रमाण काहीसे स्थिरावलेले असले तरी अद्यापही इतर देशांच्या तुलनेत पेट्रोल-डिझेल भारतामध्ये महागच दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलसाठी पर्यायी इंधन म्हणून अनेक सीएनजी गाड्या तसेच रिक्षा आणि ट्रक विकले गेलेले आहेत मात्र आता सीएनजीचे दर देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे.

पाच रुपयांनी पेट्रोल कमी केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गोदी मीडियाकडून डांगोरा पिटण्यात आला होता मात्र त्यानंतर पन्नास रुपयांनी घरगुती गॅसच्या टाकीचे दर वाढले त्यानंतर आता पुन्हा सीएनजीमध्ये देखील तब्बल सहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तब्बल 91 रुपये असा सीएनजीचा दर प्रति किलो झालेला असून सीएनजी आहे म्हणून काही लाख रुपये अधिक मोजून या गाड्या घेतल्या मात्र आता त्यांच्यावर चांगलीच संक्रांत आलेली आहे.

ऑटो रिक्षा चालक तसेच ट्रक वाहतूकदार आणि घरगुती कारचालक यांनी या प्रकरणी सर्वस्वी केंद्र सरकारला जबाबदार धरले असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महागाई रोखण्यास अपयश येत असल्याचे म्हटले आहे. पुणे रिक्षापंचायत आणि पिंपरी चिंचवड रिक्षापंचायत यांच्यातर्फे 9 ऑगस्टला खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

देशातील अनेक महानगरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजी गाड्या बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत मात्र सीएनजीमध्ये होत असलेल्या दरवाढीमुळे वाहतूकदारदेखील हैराण झालेले असून काय कमवायचे आणि काय खायचे ? असा प्रश्न या कुटुंबापुढे उभा राहिलेला आहे. देशात उत्पादित होत असलेले सीएनजी याचा आंतरराष्ट्रीय बाजाराशी काय संबंध ? असा प्रश्न उपस्थित करत आंतरराष्ट्रीय बाजारदराप्रमाणे सीएनजीचे दर ठरवणे बंद करावे अशी मागणी या व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.