मुंबईतील विलेपार्ले येथे 90 वर्षांपूर्वीच्या दिगंबर जैन मंदिरावर बीएमसीकडून बुलडोझर कारवाई करण्यात आलेली आहे. समस्त जैन बांधवांनी त्यानंतर रस्त्यावर उतरत सरकारचा निषेध केला. विशेष म्हणजे भाजपचेच अनेक पदाधिकारी आणि नेते देखील या निषेध मोर्चात सहभागी झालेले होते.
सदर जैन मंदिर हे ९० वर्षांपूर्वी तत्कालीन महापालिकेच्या परवानगीने बांधण्यात आलेले होते मात्र एका हॉटेल मालकाशी संगणमत करत मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने ही कारवाई केल्याचा आरोप जैन बांधवांनी केलेला आहे. 16 एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली.
विशेष बाब म्हणजे न्यायालयात देखील या कारवाईला आव्हान देण्यात आलेले होते मात्र त्यावर न्यायालयाचा निर्णय घेण्यापूर्वी न्यायालयाचा अवमान करत जैन मंदिर उध्वस्त करण्यात आले. काही वर्षांपासून या हॉटेल मालकाने सदर मंदिर अवैध असल्याचा दावा करत महापालिका प्रशासनाकडे धाव घेतली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी जैन समाजाकडून करण्यात आलेली आहे.