सावज हेरून ब्लॅकमेलिंग करणारी लेडी डॉन प्रीती पोलीस कोठडीत, लाभार्थ्यांची नावे येणार बाहेर ? : सविस्तर बातमी

शेअर करा

अतिशय थंड डोक्याने मात्र तेवढेच निर्दयीपणाने सावज आपल्या जाळ्यात ओढून खंडणी उकळणाऱ्या प्रीतीची काम करण्याची पद्धत पाहून भलेभले चक्रावून जातील. आजपर्यंत कित्येक जणांकडून खंडणी वसूल करून अखेर प्रीती पोलीस कोठडीत पोहचली. प्रीती ज्योतिर्मय दास उर्फ हसीना आप्पा असे तिचे नाव असून अत्यंत निष्ठुर पद्धतीने गुन्हे करणाऱ्या प्रीतीच्या चेहऱ्यावरचा समाजसेवेचा बुरखा फाटला. समाजात वावरत असताना मोठ्या मोठ्या नेत्यांसोबतचे स्वतःचे फोटो ती फेसबुकवर ठेवायची त्यामुळे मोठी धेंड तिच्या गळाला लागत असत.

भंडारा आणि नागपुरातील पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असूनही आर्थिक हितसंबंध ठेवल्याने तिने पोलीस दलात देखील स्वतःचे स्थान निर्माण केले होते .मांडवली करून सावजाकडून पैसे आले की त्यात भ्रष्ट सरकारी यंत्रणा देखील हात मारून घेत असल्याने तिला कोणाचे भय राहिले नव्हते . एकदा पैसे हातात पडले की संबंधित व्यक्तीला लाथ मारून हाकलून देण्यात येत असे . एखादा आडव्यात शिरला तर हाती असलेल्या सहकारी पोलिसांचा वापर करून पिळून काढलेल्या सावजाची मुस्कटदाबी करीत होती.

काय होती कामाची पद्धत ?

पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांसोबत काढलेल्या फोटोंचा अल्बम फेसबुकवर अपलोड असलेली प्रोफाइल ठेवणारी प्रीती बहुतांश सावज फेसबुकवरच हेरत होती. प्रारंभी फेसबुक वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ती सावज जाळ्यात ओढायची. सुहास्य वदनाचा प्रीतीचा फोटो पाहून तिची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करणाऱ्याला तिचे मग मेसेज सुरू व्हायचे. आपण मोकळ्या विचारसरणीचे असून ती काहीही बोलण्यास तयार असायची यामुळे चांगले चांगले प्रितीच्या जाळ्यात लगेच ओढले जायचे. नंतर भेटीगाठी आणि सोबत फिरण्याचा सिलसिला सुरू व्हायचा. कालांतराने आपण एकच नाही तर आपल्यासारखे अनेक जण तिच्या अवतीभवती फिरतात, हे पीडित व्यक्तीला कळायचे. त्यातून भांडणाला सुरुवात व्हायची. एकदा भांडणे सुरु झाली की नंतर प्रीती ब्लॅकमेलिंगवर उतरायची. महिन्याला विशिष्ट रकमेचा हप्ता घेऊन प्रीती शांत बसत होती. तिने अशाप्रकारे नोकरदार, व्यापारी हॉटेल व्यवसायी आणि पोलीस दलातीलही अनेकांना आपले दास करून ठेवले होते. बहुतांश सर्व व्यक्ती हे घरदार असलेले असल्याने सर्व जण गुपचूप तिला हप्ता देत होते .

नंतर नंतर याच पद्धतीने तिने स्वतःचे रॅकेट तयार केले. प्रीती भोवती विशिष्ट महिला मैत्रिणी आणि मैत्रिणींचे मित्र यांचा नेहमीच गराडा पाहायला मिळायचा. या सगळ्या त्यांच्या त्यांच्या सावजाची माहिती प्रीतीला द्यायच्या आणि त्यातून ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरु व्हायचा . तुझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविण्याची तयारी झाली आहे. तुझी काय तयारी आहे, असा प्रस्ताव दिला जायचा आणि त्याच्याकडून मोठी रक्कम उकळली जायची. प्रीतीला तिच्या गराड्यातील महिला-पुरुष हसीना आप्पा म्हणायचे. ही हसीना आप्पा अखेर पोलीस कोठडीत पोहचली आहे. यामुळे पीडित मंडळी खूश झाली आहेत . मात्र, आप्पा आतमध्ये गेल्याने तिचे लाभार्थी असलेले सरकारी यंत्रणेतील लोक मात्र आता हादरले आहेत .

अडचणीच्या वेळेस अनेकांनी मदत करण्याचे नाकारल्याने हसीना आपाचा थयथयाट सुरु झाला आहे . ‘हम तो डूबेंगे सनम, तुमको भी लेकर…’अशा शब्दात तिने तिला मदत न करणाऱ्या लोकांना धमकी दिल्याची ही चर्चा आहे. पोलिसांनी प्रीतीची कसून चौकशी केल्यास नागपूर विदर्भातील एक मोठे ब्लॅकमेलर रॅकेट ज्याचे धागेदोरे मुंबई, पुण्यापर्यंत आहे, उघड होण्याची शक्यता आहे. ह्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन प्रीतीच्या सर्व लाभार्थ्यांची नावे उघड व्हावीत अशी जनतेला आता अपेक्षा आहे .


शेअर करा