‘ राजीव गांधीच तुमचे वडील आहेत याचा पुरावा काय ? ‘, भाजपच्या मुख्यमंत्र्याची जीभ घसरली : व्हिडीओ

शेअर करा

देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रचार अत्यंत शिगेला पोहोचला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना भाजप नेत्यांनी मात्र नैतिकतेच्या मर्यादा ओलांडल्याचे दिसून येत असून भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्य केले आहे . आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी उत्तराखंडमधील प्रचारसभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागण्याच्या मुद्द्यावरून टीकाअक्षरश: पातळी ओलांडत हे विधान केले आहे .

हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलंय की, “जनरल बिपीन रावत आपल्या उत्तराखंड आणि देशाचे गौरव होते. त्यांच्या नेतृत्वात आपल्या भारतानं पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. मात्र, राहुल गांधींनी काय विचारलं, पुरावे द्या. तुम्ही कुठल्या वडिलांचे पुत्र आहात, याचे पुरावे आम्ही कधी मागितले आहेत का ?” हिमंता बिस्वा सरमा यांनी थेट माजी पंतप्रधान आणि राहुल गांधींचे वडील राजीव गांधी यांचा उल्लेख केला आहे. सोशल मीडियावरून अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी देखील हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली असून भाजपाला पराभव दिसत असल्याने आता भाजप नेते काहीही बरळत असल्याची टीका होत आहे .

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “आमच्या सैनिकाकडून पुरावे मागण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? जर लष्करानं सांगितलं आहे की, पाकिस्तानात बॉम्ब फोडला, तर फोडला आहे. त्यावर पुन्हा का बोलायचं आहे तुम्हाला? मी कधी पुरावे मागितले आहेत का, की तुम्ही खरंच राजीव गांधींचे पुत्र आहात का? मग तुम्हीही आमच्या सैनिकांचा अपमान करू नका,” असंही हिमंता बिस्वा सरमा म्हणाले आहेत.

विशेष म्हणजे हिमंता बिस्वा सरमा हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. सध्या ते आसामचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.


शेअर करा