राज्यात लॉकडाऊन नियम आणखी कडक, भाजीपाला, किराणा दुकाने फक्त इतके तासच खुली राहणार

शेअर करा

संचारबंदी लागू करूनही करोनाचा संसर्ग कमी होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आणखी कठोर पावलं उचलली आहेत. करोनाच्या संसर्गाला जबाबदार ठरणारी गर्दी टाळण्यासाठी सरकारनं आणखी कडक निर्बंध लादले आहेत. त्यानुसार, किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी ७ ते ११ याच वेळेत सुरू ठेवता येणार आहेत.

आठवडाभरापूर्वी संचारबंदी लागू करताना राज्य सरकारनं अनेक गोष्टींची मुभा दिली होती. विशेषत: जीवनावश्यक वस्तूची विक्री करणाऱ्या दुकानांना मोठी सवलत देण्यात आली होती. मात्र, तिथं सातत्यानं गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे, राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. त्यामुळं ‘ब्रेक द चेन’चे नियम अधिक कठोर करण्याची मागणी सरकारमधील काही मंत्र्यांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

आज रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत हे नियम लागू राहणार आहेत. दुकानांच्या वेळा कमी करण्यात आल्या असल्या तरी होम डिलिव्हरी करण्यासाठी रात्री आठपर्यंतची मुदत कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळं फोनवरून संपर्क साधून रात्री आठपर्यंत दुकानातून सामान मागवता येणार आहे.

किराणा, भाजीपाला, फळे, दूध डेअरी, बेकरीसह सर्व प्रकारच्या खाद्य पदार्थांची दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंतच खुली ठेवता येणार

दुकाने फक्त चार तास सुरू राहणार असली तरी होम डिलिव्हरी सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत करता येईल. स्थानिक प्रशासन गरजेनुसार त्यात बदल करू शकते.

राज्य सरकारच्या १३ एप्रिलच्या आदेशात समाविष्ट असलेल्या अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या यादीत स्थानिक प्रशासनाला बदल करावासा वाटल्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची संमती घ्यावी लागेल.


शेअर करा