
अकोले प्रतिनिधी ललित मुतडक:- अकोले तालक्यातील कळस बुद्रुक येथील सुमित मंगेश शिर्के या सिव्हील इंजिनिअरने गळफास लावून नुकतीच आत्महत्या केली होती.मयत सुमितच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील दोन महिलांवर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मयत सुमित याच्या आईने याबद्दल फिर्याद दाखल केली आहे .
मयत सुमित मंगेश शिर्के याचे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील रेखा नंदू वाकचौरे या महिलेच्या मुलीशी प्रेमसंबंध होते.या दोघांचे पाच ते सहा महिने प्रेमसंबंध सुरू राहिल्यानंतर या प्रेम प्रकरणातील मुलीने व तिच्या आईने सुमितकडे पैशासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली होती.सुमित हा सिव्हील इंजिनिअर होता.मात्र कोरोना काळात त्याचे हातचे काम गेले होते. त्यामुळे त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते.मोठा भाऊ व त्याची आई देईल तेवढेच मोजके पैसे त्याच्याकडे असत.त्यातच आपली प्रेमिका व तिची आई पैशासाठी सातत्याने तगादा लावत असल्याने तो मानसिक तणावाखाली होता त्यात सातत्याने होत असलेल्या पैशाच्या मागणीवरून सुमित याने आत्महत्या केल्याचे समोर आले होते.
सुमित शिर्के याच्या आईने दिलेली फिर्याद जशीच्या तशी
मी सविता मंगेश शिर्के वय 45 वर्षे धंदा शेती राहणार कळस बु तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर 855XXXXXXX , समक्ष पोलीस स्टेशनमध्ये हजर होऊन फिर्याद लिहून देते की, मी वरील ठिकाणी सध्या एकटी राहत असून माझे दोन मुले असून अमित मंगेश शिर्के हा नागपूर येथे एमएफ महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये नोकरीस असून तो कुटुंबासह नागपुर इथेच राहतो. माझा मयत मुलगा नामे सुमित मंगेश शिर्के ( वय 24 वर्ष ) याचे इंजिनिअरिंग शिक्षण झाले होते व तो कल्याण येथे कंपनीत काम करत होता तसेच लॉकडाऊन मुळे तो सुमारे चार महिन्यापासून आमचे मूळ गावी कळस येथे आला होता व त्याने दिनांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी आमचे राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याबाबत अकोले पोलीस स्टेशनला चुलत दीर अरुण चिमाजी शिर्के यांनी खबर दिली असून त्यावर अकोले पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 80/2021 नुसार दाखल झाला होता व पोलीस कार्यवाही करण्यात आली आणि त्यावर मुलगा सुमित याचे प्रेतावर पोस्टमार्टेम होऊन प्रेत आमचे ताब्यात दिले असता आम्ही त्याच्यावर अंत्यविधी केला होता.
त्यानंतर आम्हाला अकोले पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक 919 घुले यांनी आम्हाला जबाब देणे काम दिनांक २४ ऑगस्ट २०२१ रोजी अकोले पोलीस स्टेशनला बोलावले होते त्यावेळी मी त्यांचे समक्ष जबाब दिला होता तो जबाब मला वाचून दाखवला तो मला समजला असून सदर जबाबाचे वेळी माझी मनस्थिती ठीक नसल्याने व मला चक्कर येत असल्याने मी कुणाविरुद्धही काही एक तक्रार नसले बाबत जबाबात सांगितले होते.
परंतु माझे आता सांगणे आहे की माझा मुलगा याने ९ ऑगस्ट २०२१ रोजी आत्महत्या करण्याचे एक दिवस अगोदर दिनांक ८ ऑगस्ट 20२१ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मी व मयत मुलगा सुमित असे आम्ही घरी असताना एक महिला ही आमच्या घरी आली . घरी येऊन तिने मला तिचे नाव रेखा नंदू वाकचौरे राहणार घुलेवाडी तालुका संगमनेर असे सांगून तुझा मुलगा सुमित याचे व माझी मुलगी XXXXXXX हिचे प्रेम संबंध आहेत व त्यांची झालेली व्हाट्सअप चॅटिंग मी पाहिले असून तुझ्या मुलाने माझ्या मुलीशी प्रेम संबंध ठेवले आहेत व जर तुम्ही आम्हाला 50 हजार रुपये दिले नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्या मुलाविरुद्ध फिर्याद दाखल करून त्याला जेल मध्ये घालू, असे म्हणून आमच्याशी वाद करून ती निघून गेली.
त्यावर मी मयत मुलगा सुमित यास विचारले असता त्याने मला सांगितले की माझी व XXXX हिची मैत्री असून मी माझे मोबाईल नंबर 771XXXXXXX यावरून XXXX वाकचौरे हिचे मोबाईल नंबर 932XXXXXXX वर फोन करत असे व्हाट्सअप चॅटिंग करत असे. त्यावेळी तो खूप टेन्शनमध्ये होता व त्यावर तो दिवसभर घरीच होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी मी सकाळी ९:४५ वाजण्याच्या सुमारास सुगावचे वनविभागाचे नर्सरीमध्ये कामास चालले असताना मयत मुलगा सुमित एकटाच बसलेला होता व तो खूप टेन्शनमध्ये होता. तो माझ्याशी काहीएक बोलला नाही त्यानंतर मी कामाला निघून गेले व त्यावर मी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घरी आले असता मयत सुमित याने आमचे राहते घरात गळफास घेतलेला मला दिसले होते.
त्यानंतर मला समजले की मयत मुलगा सुमित याने गळफास घेण्यापूर्वी त्याचे व XXXX हिचे फोन चालू होते व त्या फोनवरून झालेल्या वादातूनच मुलगा सुमित याने फाशी घेतलेबाबत मला समजले आहे, परंतु सदर बाबत मी माझा भाऊ सुनील जिजाबा पांडे राहणार घुलेवाडी तालुका संगमनेर,मेहुणा मारुती सगाजी सांगडे राहणार तेजुर तालुका जुन्नर जिल्हा पुणे, चुलत पुतण्या अमोल शिर्के यांना सदर बाबत सांगून आम्ही त्यावर चर्चा केली आणि आज रोजी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी मयत मुलगा सुमित याचा मोबाईल फोन घेऊन आलो आहे.