शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक, हल्लेखोराकडून ‘ मोदी मोदी ‘ च्या घोषणा

शेअर करा

भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू येथे सोमवारी एक पत्रकार परिषद सुरू असताना एका व्यक्तीने अचानकपणे भारतीय किसान संघाचे नेते राकेश टिकैत यांच्यावर काळ्या रंगाची शाई फेकली आणि त्यानंतर तिथे तुफान राडा झाला. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला टिकैत यांच्या समर्थकांनी पकडून चांगलाच चोप दिला तर त्यावेळी हा व्यक्ती ‘ मोदी मोदी ‘ असे नारे देत होता. राकेश टिकैत यांनी सदर प्रकार हा राज्य सरकारचा कट असल्याचा आरोप केलेला आहे.

कृषी कायदे परत घेण्याची नामुष्की आल्यानंतर ही माघारी चांगलीच झोंबल्याने वेगवेगळ्या पद्धतीने राकेश टिकैत यांना बदनाम करण्याचे काम करण्यात येत आहे. भाजपशी संबंधित असलेल्या संघटना यात बहुतांश प्रमाणात सक्रिय असून राकेश टिकैत यांचे चारित्र्यहनन करणे आणि त्यांच्याविषयी खोट्या बातम्या पसरवून त्यांची बदनामी करणे असे प्रकार करण्यात येत आहेत त्यातीलच एका स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडिओ संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी ते कर्नाटक येथे आले होते.

सदर व्हिडिओमध्ये कर्नाटकचे शेतकरी नेते चंद्रशेखर हे पैशाची मागणी करताना दिसत होते यावेळी राकेश टिकैत यांनी चंद्रशेखर यांच्यावर कारवाईची गरज आहे. या प्रकरणात आपला काही हात नाही असे सांगितले आहे. याच गोष्टीबाबत अधिक विस्तृत खुलासा देण्यासाठी ते बंगळुरू येथे प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेत आलेले होते.

कार्यक्रम सुरू असताना एका व्यक्तीने अचानकपणे त्यांच्या चेहऱ्यावर शाईफेक केल्याने मोठा गोंधळ उडाला मात्र मोठ्या प्रमाणावर भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी सदर व्यक्तीला पकडून मारहाण करायला सुरु केली आणि या व्यक्तीच्या सोबत असलेल्या काही व्यक्तींनी गोंधळ घालायला सुरुवात केली. टिकैत यांच्यावर शाईफेक करणारे लोक हे चंद्रशेखर यांचे समर्थक होते असा दावा करण्यात येत आहे मात्र ज्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले त्यावेळी तो चक्क ‘ मोदी-मोदी ‘ अशी घोषणाबाजी करत होता आणि त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.


शेअर करा