अहमदनगर प्रतिनिधी : नगर शहरातील भिस्तबाग चौकातील भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेमधील ठेवीदारांचे अंदाजे रक्कम 57 कोटी रुपये चेअरमन भारत पुंड यांच्यासह इतर संचालक यांनी हडप केले आणि त्यानंतर ते गायब झालेले आहेत असा आरोप करत धांदल उडालेल्या ठेवीदारांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या उद्देशाने धाव घेतलेली होती.
संबंधित ठेवीदार यांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेत भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेचे चेअरमन भारत पुंड याला तात्काळ अटक करून आमचे पैसे आम्हाला परत मिळून द्यावेत अन्यथा ठेवीदारांचे वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल ,’ असा इशारा दिलेला आहे.
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेच्या खातेदारांनी सांगितले की ,’ चेअरमन भारत पुंड यांनी सर्व ठेवीदारांना विश्वासात घेऊन एका नामांकित आर्थिक संस्थेचे चेअरमन माझे मामा आहेत त्यांच्या संस्थेमध्ये मी तुमचे पैसे गुंतवलेले आहेत काहीही काळजी करू नका. तुमच्या वेळेला पैसे मिळून जातील ,’ असे ठेवीदारांना आश्वासन दिले होते मात्र त्यानंतर ठेवीदारांना रक्कम मिळाली नाही म्हणून आपली फसवणूक झाल्याची त्यांची भावना झाली .
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेचे ठेवीदार जानेवारी महिन्यात पैसे काढण्यास गेले असता ठेवीदारांना आज देऊ उद्या देऊ असे करत आतापर्यंत थांबून ठेवले परंतु गेल्या काही दिवसांपासून चेअरमन व कर्मचारी सर्व पसार झाले आहेत असाही आरोप ठेवीदारांकडून करण्यात आलेला आहे.