
ब्रिटनमध्ये करोनाचं नवं पण अतिशय धोकादायक असं स्वरुप समोर आल्यानंतर भारत सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. युनायटेड किंगडमहून भारतात येणाऱ्या सगळ्या विमानांना २२ डिसेंबर रोजी रात्री ११.५९ पासून ते ३१ डिसेंबर रात्री ११.५९ पर्यंत स्थगिती देण्यात आली असून संभाव्य धोका टाळण्यासाठी केंद्र सरकारने उचललेले पाऊल महत्वाचे मानले जात आहे.
ब्रिटनमधील करोना स्थिती लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयानं यासंबंधी तत्काळ हालचाली करत एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यानंतर ब्रिटनमधून येणारी विमानं रोखण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्ली आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडूनही केंद्र सरकारकडे या देशातील विमान वाहतूक थांबवण्याची मागणी करण्यात आली होती.
खबरदारी म्हणून ट्रान्झिट फ्लाईटसमधून ब्रिटनवरून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर अनिवार्य आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागणार आहे. नव्या करोना स्ट्रेनचा फैलाव रोखण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. २२ डिसेंबर रोजी रात्री ११.५९ पूर्वी टेक ऑफ केलेल्या विमानांतील प्रवाशांना भारतात आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल.
कोव्हिड १९ विषाणूचं हे नवं रुप दक्षिण – पूर्व इंग्लंड तसंच लंडनमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळताना दिसतंय. ब्रिटनमध्ये आढळलेला नव्या प्रकारचा करोना विषाणू हा आधीच्या विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक वेगाने फैलावतो. तसंच यामुळे ब्रिटनमध्ये करोना संक्रमणाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याची कबुली स्थानिक आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी दिली असून पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडन आणि दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये लॉकडाउनची घोषणा केली आहे. ब्रिटननंतर भारतात देखील शिरकाव होण्याची शक्यता असल्याने सरकारने हे पाऊल उचलले आहे .