
कोरोना संसर्गाच्या काळात नागरिकांना ऑक्सिजनपासून औषधांपर्यंत तुटवडा जाणवला. त्यामुळे नागरिकांचे कमालीचे हाल झाले. या काळातही काही लोकं झोकून देऊन सर्वसामान्य नागरिकांना मदत करत होते. यातीलच देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चिलं गेलेलं नाव म्हणजे युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. मात्र, याच मदतीमुळे आता दिल्ली पोलिसांनी त्यांची चौकशी केलीय. जवळपास 20 मिनिटं ही चौकशी झाली. यानंतर काँग्रेस आक्रमक झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मारणाऱ्या पेक्षा जीव वाचवणारा मोठा असतो असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला. तर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या चौकशीमुळे घाबरणार नसून न डगमगता मदतीचं काम सुरुच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली
दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने श्रीनिवास यांची चौकशी केली. ही चौकशी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाल्याचं सांगितलं जात आहे. रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “मदद करणाऱ्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांना मदत करण्यापासून रोखणं हा मोदी सरकारचा भयानक चेहरा आहे. या द्वेषपूर्ण आणि बदल्याच्या भावनेतून केलेल्या कारवाईला आम्ही घाबरणार नाही. यामुळे आमचं मनोधैर्यही कमी होणार नाही. आमचा सेवेचा संकल्प असाच दृढ राहिल.”
देशात मागील एका वर्षात कोरोना पीडितांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी श्रीनिवास दिवसरात्र काम करत असल्याचं दिसत आहे. कोरोना पीडितांच्या मदतीसाठी त्यांनी कर्नाटक, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, झारखंडसह अनेक राज्यांमध्ये SOSIYC ची पथकं तयार केलीय. हे पथक त्या त्या भागातील गरजूंना मदतीसाठी कायम तयार असते. नागरिकांना मदत हवी असेल तर ते श्रीनिवासन यांना टॅग करत आहेत. यानंतर त्यांना तातडीने मदत पोहचवली जात आहे. श्रीनिवासन यांनी केवळ सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध करुन दिले असं नाही, तर गरजेनुसार रेमडेसिव्हीर इंजेक्शनचीही व्यवस्था केली आहे.