अहिल्यानगर महापालिकेच्या नगररचना विभागाचा कारभार कशा पद्धतीने चालतो हे नगरकरांपासून लपून राहिलेले नाही. सहाय्यक संचालक राम चारठाणकर नगर शहरात कार्यरत असताना कशा पद्धतीने बांधकाम परवानगी देण्यात आल्या हे नगरकरांना चांगलेच ठाऊक असून त्यानंतरही परत परिस्थितीत काही बदल झालेला नाही. केडगाव लिंक रोड परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यालगतच्या सर्विस रोडमध्ये चक्क बेकायदेशीर बांधकाम सुरू असून दोन महिन्यापूर्वी या बांधकामाला स्थगिती देण्यात आली मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगणमत करून पुन्हा बांधकामाला परवानगी दिली. सदर परवानगी रद्द करावी अन्यथा महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तक्रारदार राजेंद्र मोहन पठारे यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेला आहे.
राजेंद्र मोहन पठारे यांनी यासंदर्भात आयुक्तांना एक निवेदन दिलेले असून त्यामध्ये,’ केडगाव येथील सर्वे नंबर 80/2/2/5 या ठिकाणी प्लॉट नंबर एक येथे गुंफाबाई भाऊसाहेब सातपुते आणि इतर व्यक्तींनी चुकीची कागदपत्रे सादर केली आणि बांधकाम लेआउट परवानगी मिळवली मात्र त्यांनी चुकीचे आणि अनधिकृत बांधकाम केलेले असून त्याची सखोल चौकशी करत बांधकाम परवानगी रद्द करावी .
महापालिकेने संबंधित बांधकामाला काही काळ स्थगिती आदेशही दिला मात्र त्यानंतरही बांधकाम सुरू असून महापालिका प्रशासनाकडून त्याकडे कानाडोळा केला जात आहे. सर्व्हिस रस्ता नकाशात असून या रस्त्यावर लेआउट मंजूर करताना दोन्ही रस्ते दर्शवण्यात आलेत मात्र प्रत्यक्षात मुख्य रस्त्यालगत बांधकाम सुरू आहे. सरकारच्या नियमानुसार रस्त्याच्या मध्यापासून वीस मीटर अंतर सोडणे बंधनकारक असताना या नियमाला तिलांजली देत बांधकाम सुरू आहे. चुकीच्या पद्धतीने दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यात यावी सोबतच केलेले बांधकाम पाडण्यात यावे तसेच चुकीची मंजुरी देणाऱ्या अधिकारी कर्मचारी जागामालक अभियंता आणि संबंधित सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ,’ अशी मागणी राजेंद्र पठारे यांनी केलेली आहे. अर्जाची दखल घेतली नाही तर दहा दिवसानंतर महापालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येईल असाही त्यांनी इशारा दिलेला आहे.