विशाल गवळी याला पोलीस यंत्रणेनेच मारलं ,  कुणी केला खळबळजनक आरोप ?

शेअर करा

13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करणारा आरोपी विशाल गवळी याने काल मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केली होती . आरोपीने शौचालयात टॉवेलने गळफास घेतला अशी माहिती देण्यात आलेली असली तरी विशाल गवळी याच्या वकिलांनी पोलीस यंत्रणेने त्याचा खून केल्याचा आरोप केलेला आहे. विशाल गवळी याने कल्याणच्या कोळसेवाडी येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून स्वत:च्या घरी आणले होते आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. विशेष बाब म्हणजे विशाल गवळी याच्या पत्नीने देखील त्याला या गुन्ह्यात मदत केली होती. 

विशाल गवळी हा कल्याणचा सराईत गुन्हेगार असून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्यानंतर त्याने दारू पिली आणि कल्याणमधून पळ काढत थेट शेगाव गाठले मात्र पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच त्याने टॉवेलने फाशी घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी म्हटले की, मला सकाळी सात साडेसातच्या सुमारास फोन आला आणि सांगण्यात आले की, विशालने असे असे केले. त्यानंतर मी माहिती घेतली तर मला कळाले की, सकाळी शौचास कैद्यांना बाहेर काढतात, त्यावेळी त्याने असे काहीतरी केले आहे.

मला शंभर टक्के संशय आहे की, त्याला पोलिस यंत्रणेनेच मारले आहे कारण अक्षय शिंदेच्याबाबतही असेच झाले होते. अक्षय शिंदेसारखेच याला मारतील म्हणून मी आधीच न्यायालयात अर्ज केला होता मात्र त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही. जी भीती होती तेच झाले. मी विशाल गवळीला २०-२५ दिवसांच्या अगोदर भेटलो होतो त्यावेळी त्याने मला सांगितले होते की, मी काही केले नाही आणि मी निर्दोष आहे. त्याने मला सांगितले होते की, मला इथेही धोका आहे आणि अखेर तसेच झाले . 


शेअर करा