शिवाजी कर्डिलेंनी फक्त रील्स फिरवले आरोपी कुठं आहेत , राहुरीतील विटंबना प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी प्राजक्त तनपुरे यांचे उपोषण सुरूच

शेअर करा

‘ राहुरीत राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याची विटंबना होऊनही आतापर्यंत या पाठीमागील सूत्रधार शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दोन दिवस गाव बंद ठेवण्यात आले. घटनेला 19 दिवस उलटले मात्र संशयित देखील पोलिसांना सापडलेला नाही. हिंदूंच्या आणि महापुरुषांच्या नावाने मते मागणाऱ्या सरकारला घटनेचे गांभीर्य राहिलेले नाही म्हणून आत्मक्लेष म्हणून आपण उपोषणाला सुरुवात करत आहोत ,’ असे म्हणत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे. 

राहुरी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काळीफित लावत उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्यासोबत सुमारे 50 पेक्षा जास्त ग्रामपंचायती आणि संघटना सहभागी झालेल्या आहेत. 

प्राजक्त तनपुरे म्हणाले की ,’ राहुरी शहरातील बुवासिंद बाबा तालीम येथे 26 मार्च 2025 रोजी भर दुपारी राष्ट्रपुरुषांच्या अर्धकृती पुतळ्यांची विटंबना झाली. शिवप्रेमींनी रास्ता रोको केले. पोलीस प्रशासनाने आरोपींना ताब्यात घेण्यात येईल असे आश्वासन दिले मात्र साधा संशयित देखील ताब्यात घेण्यात आला नाही त्यामुळे तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. 

प्राजक्त तनपुरे पुढे म्हणाले की ,’ सदर घटनेवर आपल्याला राजकारण करायचे नाही मात्र राज्यकर्त्यांनी गेल्या 19 दिवसात कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आमदार कर्डिले यांनी रास्ता रोको झाल्यानंतर शिवप्रेमींना आश्वासने दिली आणि त्याचे रील्स काढून सोशल मीडियावर फिरवले मात्र त्यानंतर ते गायब झाले. आतापर्यंतच चकार शब्द त्यांनी काढलेला नाही. आरोपींना अटक करावी यासाठी आपण उपोषणाला सुरुवात केलेली आहे , असे त्यांनी म्हटलेले आहे. 


शेअर करा