नगर शहरात विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने निकाल लागला त्यानंतर तरी भावी आमदारांनी आत्मपरीक्षण करायला हवे होते मात्र दुर्दैवाने तसे झालेले नाही. बोटावर मोजण्याइतक्या चार जवळच्या व्यक्तींचे मित्रमंडळ म्हणत स्वतःचाच उदो उदो करून घेण्यात ही भावी मंडळी धन्य मानत असून नागरिकांच्या प्रश्नांचा सर्वच भावी आमदारांना विसर पडलेला आहे . किरकोळ कामासाठी भावी आमदाराच्या पाठी फिरण्यापेक्षा सत्ताधारी संग्राम जगताप देखील ‘ इझी ऍक्सेसिबल ‘ असल्याने नागरिकांनी तरी भावी आमदारांच्या पाठी का फिरावं ?
विद्यमान आमदार यांच्याकडे मुबलक मनुष्यबळ , पैसा यावर यावर त्यांची सत्ता टिकून आहे असा आरोप भावी आमदारांकडून करण्यात येतो मात्र केवळ इतक्याच गोष्टींवर सत्ता मिळत नाही त्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज लागते मात्र अशी फौज आज रोजी आमदार संग्राम जगताप वगळता इतर कुणाकडेही नाही. संग्राम जगताप यांच्याकडील मनुष्यबळ सक्षम आणि कार्यक्षम असल्याने नागरिक अडीअडचणीला त्यांच्याकडेच मदतीसाठी धावतात मात्र या गोष्टीवर आत्मपरीक्षण करण्याऐवजी केवळ मनुष्यबळ आणि पैसा यावर हा विषय लोटून भावी आमदार स्वतःचा निष्क्रियपणा पद्धतशीरपणे लपवतात.
आमदार संग्राम जगताप यांच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी भावी आमदारांकडून आत्मसात केल्या जात नाहीत उलट मदतीसाठी आलेल्या व्यक्तींसोबत रील्स आणि फोटोसेशन करून घेण्यावरच सध्या सगळ्याच भावी आमदारांचे समाजकार्य विसंबून आहे. बोल घेवडे आणि रिल घेवडे यांच्याच चौकटीत शहरातील विरोधी पक्ष बंदिस्त असून अडचणीतील व्यक्ती नक्की फोटो काढून घेण्यासाठी आलाय की अडचण सोडवण्यासाठी असा प्रश्न मदतीसाठी आलेल्या माणसालाही नक्कीच पडत असणार हो ना..
अहिल्यानगर शहरात फिरून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या चार नेत्यांची नावे सांगा म्हटले तर स्वर्गीय अनिल राठोड यांच्यानंतर दुसरे नाव नगरमध्ये सहसा कुणाला सांगता येणार नाही . शिवसेनेत फूट पडल्यानंतर नक्की कोण कुठे ? याचा नगरकरांनाही तपास नाही तशीच परिस्थिती सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची झालेली आहे. विधानसभा निवडणुकीतील उमेदवार वगळता बाकीचे दुर्बीण लावून शोधावे इतपत विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत . शोले चित्रपटातील ‘ निम्मे इकडे जा निम्मे तिकडे जा बाकीच्यांनी माझ्या पाठीमागे या ,’ ह्या डायलॉगची आठवण या निमित्ताने आल्याशिवाय राहत नाही इतपत शहरातील विरोधी पक्ष सध्या रिकामा झालेला आहे. कागदोपत्री केवळ नावे आहेत पदेही आहेत मात्र कुठलीच राजकीय भूमिका नाही. कागदोपत्री अस्तित्व टिकवणे हेच फक्त राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सध्याचं धोरण दिसत असून काँग्रेस पक्षाची परिस्थिती तर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटापेक्षाही दयनीय आहे.
कुठे गेला तो काळ जेव्हा पेट्रोल एक रुपयांनी वाढलं तर बैलगाडी आंदोलन व्हायचं..हेल्मेट सक्तीच्या विरोधात फेटे घालून आंदोलक रस्त्यावर यायचे. गॅस सिलेंडर दहा रुपयांनी वाढला तर लोक रस्त्यावर यायचे पण आज सगळं काही बदललंय कारण विरोधकांमध्ये इच्छाशक्तीच राहिलेली नाही. निष्क्रिय विरोधी पक्ष आपल्यावर गुन्हा दाखल होईल अन न्यायालयाच्या खेटा माराव्या लागतील या भीतीने शांत पडलेला असून निवडणुकीच्या निमित्तानेच पुन्हा डोकं वर काढेल मात्र अशांना जनता निवडणुकीत पुन्हा एकदा अस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित.
आमदार संग्राम जगताप सत्ता हाती आहे म्हणून कामे करतात असे देखील आरोप त्यांच्यावर अनेकदा भावी आमदार करत असतात मात्र सत्ता हाती नसताना देखील संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण जगताप यांनी अनेक जणांची कामे मार्गी लावली आहेत. जगताप कुटुंबीयांच्या पाठीमागे उभी असलेली कार्यकर्त्यांची फळी ही एका रात्रीत उभी राहिलेली नाही. प्रचंड सक्रियता , निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज यामुळे संग्राम जगताप यांची स्वतःची प्रचार यंत्रणा उभी राहिलेली आहे आणि त्याचीच परिणीती विधानसभा निवडणुकीच्या निकालात झाली.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तरी संग्राम जगताप यांचे विरोधक एकत्र येतील अशी अनेक जणांना आशा होती मात्र आजही परिस्थितीत काहीच फरक झालेला नाही. इंडिया आघाडी शहरात आहे की नाही इतपत दयनीय परिस्थिती असून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे देखील नेमके किती कार्यकर्ते ठाकरे गटात आहेत आणि किती शिंदे गटात ? याची शहर शिवसेनेलाच खबरबात नसावी. स्वर्गीय अनिल राठोड यांच्या काळात त्यांनी एकट्याने स्वतःच्या खांद्यावर शिवसेना सांभाळली मात्र आज रोजी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे असे कुठलेही संघटन कौशल्य असलेले नेतृत्व दिसून येत नाही.
शहरात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आज सुशिक्षित नेतृत्व आहे तर शरद पवार गटाकडे देखील सुशिक्षित नेतृत्व शहरात आहे मात्र ‘ अति शहाणा त्याचा बैल रिकामा ‘ अशी परिस्थिती या दोन्ही पक्षांची शहरात झालेली आहे. फोटो , व्हिडिओ आणि रिल्स याच्यावर पक्ष चालत नाही तर वेळोवेळी राजकीय भूमिका घेणेदेखील गरजेचे असते याचाही विरोधी पक्षाला विसर पडलेला आहे. शहरात अनेक मुद्दे आहेत मात्र मुद्द्यांना हात घालण्याची इच्छाशक्तीच विरोधी पक्षात दिसून येत नाही. महापालिकेतील बांधकाम परवाने असो , शहरातील रस्ते असो , पथदिवे असो किंवा शहरातील बेरोजगारी सर्वच पातळीवर अहिल्यानगर शहरातील विरोधी पक्ष हा सपशेल अपयशी ठरतो आहे.