महाराष्ट्रात एक अत्यंत धक्कादायक असे प्रकरण समोर आलेले असून पुण्यातील एका व्यावसायिकाला आमिष दाखवत बिहारमध्ये बोलवण्यात आले आणि त्यानंतर त्यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. पुण्यात या घटनेनंतर व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. लक्ष्मण साधू शिंदे (५५, रा. डीपी रोड, कोथरूड) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून पाटणा येथील विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण शिंदे व्यवसायिक होते. त्यांचा खेडशिवापूर येथे ‘सेंट्रिफ्युगल कास्टिंग बेअरिंग’चा व्यवसाय होता. व्यवसायाच्या निमित्ताने ते वेगवेगळ्या राज्यांत जात होते. त्यांचा बिहारमधील काही व्यक्तींशी व्यवसायाच्या निमित्ताने संपर्क झाला आणि त्या व्यक्तींनी शिंदे यांना पाटण्यात बोलावले.
शिवराज सागी नावाच्या व्यक्तीशी त्यांचे फोन व ई-मेलद्वारे बोलणे झाले होते. त्याने निमंत्रण दिल्याने शिंदे ११ एप्रिल रोजी विमानाने पाटणा येथे गेले होते. पाटणा येथे गेल्यानंतर त्यांचा मुलीशी संवाद झाला होता. रात्री साडेआठच्या सुमारास लक्ष्मण शिंदे यांच्या मोबाइलवरून ‘मी आता झारखंड येथील कोळसा खाणीत मशिन व टूल पाहण्यास जात आहे,’ असा मेसेज त्यांच्या मुलीला आला होता. ही खाण १२०० फूट जमिनीखाली असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले होते मात्र त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले.
शिंदे यांच्या कुटुंबीयांनी अखेर कोथरूड पोलिस ठाण्यात १२ एप्रिलला मिसिंगची तक्रार दाखल केली. कोथरूड पोलिसांचे पथक पाटणा येथे गेले असता खुनाचा प्रकार उघडकीस आला. शिंदे यांचा मृतदेह बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील घोसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला. स्थानिक पोलीस बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करणार होते मात्र याच वेळी कोथरूड पोलिसांचे पथक तिथे पोहोचले आणि मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.
‘झारखंडमधील एका खाणीचे खोदकाम करण्यासाठी उपकरणे हवी आहेत. १०० कोटी रुपयांची ऑर्डर आहे,’ अशी बतावणी आरोपींनी केली होती. लक्ष्मण शिंदे यांच्या खून प्रकरणात काही संशयितांना पाटणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असे कृत्य करणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय असून अशाच पद्धतीने व्यावसायिकांना बहाणा करून बोलावणे, तिथे आल्यानंतर त्यांना लुटणे तसेच त्यांच्याकडील रक्कम काढून घेऊन त्यांची हत्या करणे अशी या टोळीची कार्यशैली असल्याचा संशय आहे.