मनोहर भिडे यांना चावला भटका कुत्रा , चावणाऱ्या कुत्र्याला दत्तक घेण्याची घोषणा 

शेअर करा

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर भिडे यांच्यावर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला असून सांगलीमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. संभाजी भिडे हे एका धारकऱ्याच्या घरी भोजनाच्या कार्यक्रमासाठी जात असताना माळीगल्ली परिसरात एका भटक्या कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतला. 

मनोहर भिडे यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून आता महापालिकेचे कर्मचारी सांगलीतील माळीगल्लीमध्ये पोहोचले असून या कर्मचाऱ्यांकडून आता गल्लीतील सर्व भटकी कुत्रे पकडण्याची मोहीम राबवली जात आहे. 

भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू असताना उल्हासनगर मधील अॅडव्होकेट जय गायकवाड यांनी ,’ मनोहर भिडे गुरूजी यांच्यावर ज्या कुत्र्याने हल्ला केला त्या कुत्र्याला दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करणार तसंच त्या कुत्र्याची संपूर्ण काळजी आम्ही स्वतः घेणार आहे. भिडेंना चावलेला कुत्रा नागरिकांना जर सापडला तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. स्वराज्य संघटनेकडून त्या नागरिकाचा मोठा सत्कार देखील आम्ही करू’, अशी माहिती जय गायकवाड यांनी दिली आहे

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘ कुत्र्याला कुठून दुर्बुधी सुचली…कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही. आता कुठला कुत्रा पोलीस शोधत आहेत, याची माहिती अजून कळली नाही पण मी माहिती घेतो . या प्रामाणिक कुत्र्याने का असा राग धरला यासंदर्भात खरंतर एसआयटी लावून चौकशी केली पाहिजे ,’ असंही म्हणत विजय वडेट्टीवार यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.


शेअर करा