
कोरोना विषाणूचा संसर्ग पसरल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन जगभरात सगळीकडे सुरू आहे. त्यातून अनेक निष्कर्ष हाती येत आहेत. हैदराबादमधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ (IIPH) या संस्थेतले प्रा. डॉ. जी. व्ही. एस. मूर्ती यांनी असं म्हटलं आहे, की फ्लूप्रमाणेच कोविड-19 हा आजार अनेक पिढ्यान पिढ्या राहील. तो पूर्णपणे नष्ट होणार नाही. देशातल्या वेगवेगळ्या भागांतल्या आकडेवारीचा विचार करता जून महिन्याच्या अखेरीपर्यंत दक्षिण आणि पश्चिम भारतात कोविड-19च्या रुग्णांची संख्या घटू शकते, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. ( will corona go forever )
गुरुवारी (27 मे) ‘पीटीआय’शी बोलताना प्रा. डॉ. जी. व्ही. एस. मूर्ती म्हणाले, ‘उत्तर आणि पूर्व भारतातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होण्यासाठी जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत वाट पाहावी लागेल, असा अंदाज आहे. या महासाथीदरम्यान राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्याची घाई करणं हे कोरोना विषाणूची दुसऱ्या लाट वेगाने पसरण्याचं एक कारण ठरलं.’
जेव्हा एखादा संसर्ग समाजात येतो, तेव्हा तो हळूहळू पसरत जातो. त्यानंतर तो स्थानिक पातळीवर पसरत जातो. फ्लूचा संसर्ग अनेक पिढ्यांपासून आपल्यासोबत आहे. तसंच कोविड-19च्या बाबतीत होईल. तो अनेक पिढ्यांपर्यंत आपल्यासोबत राहू शकतो, असा अंदाज डॉ. मूर्ती यांनी व्यक्त केला. संसर्गाच्या दृष्टीने संवेदनशील व्यक्ती मोठ्या संख्येने एकत्र येतात, तेव्हा तो संसर्ग पसरण्यास चालना मिळते, असंही ते म्हणाले.
‘कोविड-19 संसर्ग होऊन गेल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती तीन ते सहा महिन्यांच्या छोट्या कालावधीसाठीच राहते. त्यानंतर संबंधित व्यक्तीला पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही मुख्यमंत्री, तसंच राष्ट्रीय नेते यांना दुसऱ्यांदाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं आपल्याला दिसलं आहे. यावरून हे स्पष्ट होतं, की कोणतीच रोगप्रतिकारशक्ती स्थायी स्वरूपात नाही,’ असंही ते म्हणाले.
कोविड-19ची पुढची लाट यायला पाच ते सहा महिने लागू शकतात. तोपर्यंत लोकांच्या शरीरात तयार झालेली प्रतिकारशक्ती संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे नोव्हेंबरच्या दरम्यान पुन्हा काळजीची स्थिती उद्भवू शकते. महामारी येते, तेव्हा वयोवृद्ध व्यक्तींचे बळी जातात. मात्र प्रत्येक वेळी येणाऱ्या लाटेत प्रौढ आणि तरुणांसह मुलांनाही संसर्ग होतो. पुढच्या लाटेचाही हाच धोका आहे,’ असा इशारा डॉ. मूर्ती यांनी दिला.
‘देशातल्या 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 80 टक्क्यांहून अधिक नागरिकांना नोव्हेंबरपर्यंत लस दिली गेली, तर कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याला आपण प्रतिबंध करू शकतो. आपल्याला धोका कमी करायचा असेल, तर किमान फेब्रुवारी 2022 पर्यंत मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र येण्यावर निर्बंध कायम राखायला हवेत. पुरेशी काळजी घेऊन शाळा आणि कार्यालयं उघडली जाऊ शकतात ‘ असेही डॉ. मूर्ती पुढे म्हणाले .