मोठी बातमी .. कुंभमेळा उत्सवात आणखी एक ‘ धक्कादायक ‘ प्रकार उघडकीस

शेअर करा

कुंभमेळा उत्सवानंतर कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. देशात विविध राज्यात कोरोनाची मोठी लाट आल्याचे यानंतर दिसून आले अशातच कुंभमेळा उत्सवादरम्यान नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून कुंभमेळा उत्सवादरम्यान घेण्यात आलेले 1 लाख कोविड रिपोर्ट बनावट असल्याचं समोर आलं आहे.

कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची कोरोना टेस्ट करण्यासाठी उत्तराखंड सरकारने खासगी संस्थांसोबत करार केला होता. पण या खासगी संस्थांनीच बनावट रिपोर्ट सादर केल्याचं समोर आलंय. कुंभमेळ्यात आलेल्या लोकांचे बनावट कोरोना रिपोर्ट सादर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर हरिद्वार जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी तपासाचे आदेश दिले होते यानंतर तपास झाल्यावर धक्कादायक खुलासे झाले आहेत.

धार्मिक उत्सवासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांनी उत्तराखंड गाठले होते. जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव 1 ते 30 एप्रिलदरम्यान राज्यात भरवण्यात आला होता. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप देशभरात सुरु होण्याची शक्यता असताना देखील परिस्थितीचे भान न ठेवता केवळ हिंदू उत्सवाला विरोध केल्याचा मेसेज समाजात जाऊ नये म्हणून कुंभमेळ्याला परवानगी देण्यात आली. लाखोंच्या संख्येने लोकांनी कुंभमेळ्यासाठी गर्दी केली होती. यावेळी कोरोना निर्बंधांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले होते. कुंभमेळ्याच्या परवानगी दिल्याने सरकारवर टीकाही झाली. पण सरकारने नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केलं.

चिफ डेव्हलपमेंट ऑफीसर सौरभ गहारवार यांच्या नेतृत्वातील समितीने याप्रकरणाचा तपास केला. ज्यात त्यांना अनेक अनियमितता आढळून आली. 50 लोकांची नोंदणी करण्यासाठी एकच मोबाईल क्रमांक वापरण्यात आला होता. तसेच 700 लोकांचे सॅम्पल घेण्यासाठी एकच अॅटिंजन टेस्ट कीट वापरण्यात आली होती. सॅम्पल कलेक्टर म्हणून ज्यांचे नाव नोंदण्यात आले होते, त्यातील अनेकजण विद्यार्थी होते किंवा इतर राज्यातील लोक होते. जे कधीही हरिद्वार येथे आले नव्हते तसेच सॅम्पल घेणाऱ्याने सॅम्पल कलेक्ट करताना त्याठिकाणी उपस्थित असणे आवश्यक असते, याच्याकडे देखील डोळेझाक करण्यात आली.

सुरुवातीच्या तपासात हॉस्पिटल्स आणि खासगी लॅबनी मोबाईल क्रमांक आणि ओळख पत्राच्या आधारावर संबंधित नसलेल्या लोकांचे कोविड रिपोर्ट दिल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर याप्रकरणी सखोल तपासाचे आदेश देण्यात आले होते. उत्तराखंड हायकोर्टाने कुंभमेळ्यादरम्यान दररोज 50 हजार कोरोना टेस्ट करण्याचे निर्देश दिले होते. टार्गेट पूर्ण झालेलं दाखवण्यासाठी लॅबने बनावट रिपोर्ट सादर केले होते. कुंभमेळ्यादरम्यान जिल्हा आरोग्य विभागाने 24 खासगी लॅब आणि 9 संस्थांवर RT-PCR आणि अँटिजन टेस्ट करण्याची जबाबदारी दिली होती तसेच तपास पूर्ण होईपर्यंत लॅबचे पैसे रोखण्यात आले होते.


शेअर करा