कोरोनाने मयत व्यक्तींची कुटुंबे हेलपाटे मारून दमली अन अखेर ‘ तो ‘ आदेश आला मात्र तरीही..

शेअर करा

कोरोनाने मृत झालेल्या नागरिकांच्या वारसांना 50 हजार रुपये मदत मिळण्याची शक्यता निर्माण झालेली असून याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे. सदर मदतीसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत तर मदत देण्याची कारवाई कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयातून आपत्ती व्यवस्थापन विभागातून होणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी याची माहिती दिली आहे.

कोरोनाने मृत्यू झालेल्या नातेवाईकांच्या वारसांना 50 हजार रुपये मदत देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती मात्र सदर प्रकरणाचा अध्यादेश आलेला नसल्याने आतापर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नव्हती, त्यामुळे तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी कित्येक नागरिक हेलपाटे मारून गेले मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही आणि त्यांना अद्याप कुठलीच मदत मिळालेली नाही.

अखेर 12 ऑक्‍टोबर रोजी आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन आरोग्य विभागाचे अपर सचिव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची सूचना केलेली आहे त्यामुळे वारसांना ही मदत येण्याची आशा निर्माण झालेली असून त्यांना यामुळे थोडासा का होईना दिलासा मिळणार आहे.

मयत रुग्णाच्या नातेवाईकांना ही मदत मिळणार असली तरी दुसरा एक प्रकार बहुतांश ठिकाणी घडलेला असून त्यामध्ये कोरोनाने मयत पावलेल्या रूग्णांची नोंद ‘ कोरोना ‘ या शब्दाचा उल्लेख केलेला नसल्याने कितपत लोकांपर्यंत ही मदत पोहोचेल याचादेखील संभ्रम आहे. नगर चौफ़ेरने आधी देखील कोरोना काळात अनेक रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोनाचा उल्लेख नसल्याचे प्रकरण समोर आणले होते.

कोरोना रुग्णांचा आकडा हा त्यावेळी जाणीवपूर्वक लपवण्यात आला का ? यावर देखील नगर चौफ़ेरने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. नगर जिल्ह्यातील पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत मिळून आतापर्यंत सहा हजार 985 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद शासन दरबारी आहे मात्र अनेक जणांचा मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोनाचा उल्लेखच नाही त्यामुळे ही मदत नक्की किती जणांना मिळणार याबद्दल देखील संभ्रम आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून या मदती बाबतची कार्यवाही होणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत त्यामुळे ऑनलाइन अर्ज कसा करायचा कधी करायचा ? त्याची मुदत काय ? अर्जाचा विहित नमुना लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे याबाबत नागरिकांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.


शेअर करा