कोल्हापूर पाठोपाठ प्रशांत कोरटकर याच्यावर आता नागपूरमध्येही गुन्हा दाखल 

शेअर करा

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्या विरुद्ध नागपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलतरोडी पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम १५१, १९६, २९९, ३०२, ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे . 

दीपक रमेशराव इंगळे (रा. मानकापूर) यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रशांत कोरटकर याचा कसून शोध सुरु आहे . कोल्हापूर पोलिसांनी देखील तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे. 

प्रशांत कोरटकर याच्या विषयी माहिती काढण्यासाठी कोल्हापूर पोलीस कोतवाली, महाल, सदर या भागात छापे घालत आहेत. ‘स्मार्ट पोलिसिंग’साठी ओळखल्या जाणाऱ्या गुन्हे शाखेला सुद्धा अद्याप प्रशांत कोरडकर बाबत कोणताही सुगावा लागलेला नाही हे विशेष.कोरटकर याला अटक न करण्यासाठी पोलिसांवर देखील दबाव असल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे. 

इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना अश्लील शिवीगाळ करीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरवर अटक करा, अन्यथा या प्रकरणाच्या विरोधात शिवभक्तांच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा खणखणीत इशारा श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोंसले यांनी दिला असून कोरटकर हा फडणवीस यांच्या जवळचा व्यक्ती असल्याची चर्चा आहे. 


शेअर करा