
पैशाच्या देवाण घेवाणवरून वाद झाला आणि त्यादरम्यान झटापट होऊन सासर्याने सुनेच्या पाठीवर गोळी झाडून जखमी केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील बोर वाकडी येथे शनिवार 10 ऑक्टोबर रोजी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी बोर वाकडी येथे आरोपी मोहन भाऊराव क्षीरसागर व त्याची सून सोनाली अक्षय शिरसागर यांच्यात पैशाच्या देवाण-घेवाण वरून वाद झाला. आरोपीची वागणूक चांगली नसल्याने आरोपी हा सुनेची गावात बदनामी करत होता. सासरा आणि सुन यांच्यात काही बोलचाल झाल्यामुळे सासऱ्याने रागाच्या भरात सुनेच्या पाठीत गोळी झाडून जखमी केले. तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सुनेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहेत. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी सोनाली अक्षय शिरसागर यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहन भाऊराव क्षीरसागर याच्या विरोधात भा द वि 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.