पुण्यात स्वारगेट बसस्थानकातील एका बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपी फरार झालेला होता त्याला अखेर शिरूर तालुक्यातील गावातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याला 12 मार्चपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
आरोपी दत्तात्रय गाडे याचे एक एक कारनामे आता बाहेर येत असून चोरी, चेन स्नॅचिंग आणि इतर प्रकरणात दत्तात्रय गाडेवर अर्धा डझनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. एका प्रकरणात त्याला अटकही झाली होती मात्र २०१९ मध्ये तो जामिनावर बाहेर आला. शिरुर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासातून गाडेबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे . विशेष बाब म्हणजे सर्वाधिक गुन्हे महिलांनी नोंदवलेले आहेत.
२०१९ मध्ये दत्तात्रय गाडे यांने कार कर्ज काढून कार विकत घेतली होती आणि पुणे-अहिल्यानगर महामार्गावर तो कॅब चालवायचा. अंगावर दागिने असलेल्या आणि श्रीमंत दिसणाऱ्या महिलांना तो लिफ्ट द्यायचा आणि महामार्गावरच निर्जनस्थळी घेऊन जात चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने पैसे घ्यायचा आणि महिलांना तिथेच सोडून तो निघून जायचा. दत्तात्रय गाडेच्या घरची परिस्थिती बेताची असून त्याचे वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.