अहिल्यानगर: डाळिंब पिक विमा नुकसान भरपाई न दिल्याने सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळकी यांनी शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम रुपये ३७०००/- व तक्रारीच्या खर्च रुपये १० हजार अशी एकंदरीत रक्कम रुपये ४७ हजार सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळकी यांनी द्यावी असा महत्त्वपूर्ण आदेश अहिल्यानगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीमती प्रज्ञा देवेंद्र हेंद्रे, सदस्य श्रीमती चारू विनोद डोंगरे व दुसऱ्या सदस्या श्रीमती संध्या श्रीपती कजवे यांनी नुकताच दिला आहे या प्रकरणात तक्रारदार शेतकऱ्यातर्फे एडवोकेट सुरेश लगड यांनी काम पाहिले
थोडक्यात हकीगत अशी की, वाळकी येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल गोविंद कासार यांनी त्यांचे मालकीचे गट नंबर ३४ मध्ये ७४ आर क्षेत्रामध्ये भगवा डाळिंब पीक घेतले होते त्या पिकाचा सन २०१६ सालासाठी सामनेवाले नंबर एक रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे विमा उतरवला होता तसेच सामनेवाली नंबर दोन सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळकीचे तक्रारदार विठ्ठल गोविंद कासार हे खातेदार आहेत. तक्रारदाराने रक्कम रुपये ५५००/-रकमेचा विमा सामनेवाले नंबर २ सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळकी मधून सामनेवाले नंबर १ रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे उतरविला होता. तक्राराचे लगतच्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झाली. परंतु या तक्रारदारास ती मिळाली नाही म्हणून कासार यांनी पिक विमा रक्कम मिळावी म्हणून सामनेवाले सेंट्रल बँकेस मागणी केली परंतु बँकेने पिक विमा रक्कम दिली नाही.
अखेर कासार यांनी यांनी दिनांक १५/०९/२०१७ रोजी वकिलामार्फत सामनेवाले विमा कंपनी व सेंट्रल बॅंकेस नोटीस देऊन पिक विमा नुकसान भरपाईची मागणी केली असता पिक विमा नुकसान भरपाई या शेतकऱ्यास मिळाले नाही म्हणून तक्रार शेतकरी कासार यांनी अहिल्यानगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागितली असता आयोगाने वरील प्रमाणे संपूर्ण वस्तुस्थिती समजून घेऊन नुकसान भरपाई मंजूर केली विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रारदाराने उतरवलेला पिक विमा हप्ता रक्कम रुपये पाच हजार पाचशे हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया वाळकी शाखेने विहित मुदतीत म्हणजे १४/०७/२०१६ पर्यंत न पाठवता विलंबाने म्हणजे दिनांक २/०८/२०१६ रोजी सामनेवाले रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठवला. पिक विमा हप्ता विहित मुदतीत न पाठवल्याने विमा कंपनीने हप्ता स्वीकारला नाही त्यामुळे तक्रारदाराचा पिकविमा उतरवला गेला नाही व तक्रारदार या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याने यामध्ये सामनेवाले नंबर २ या सेंट्रल बँकेने कर्तव्यात कसूर केली असे निरीक्षण देखील नोंदवले.
सेंट्रल बँकेने पीक विमा हप्ता रक्कम विहित मुदतीत भरलेली नसल्याने तक्रारदार शेतकऱ्यास विमाचा लाभ मिळाला नाही यात केवळ सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या हलगर्जीपणामुळे तक्रारदार यांना शारीरिक ,मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला व तक्रारीचा खर्चही करावा लागला. माननीय आयोगाने डाळिंब पीक विमा नुकसान भरपाई पोटी तक्रारदार यांना रक्कम रुपये ३७०००/-हजार व त्यावर ९/०१/२०१८ पासुन दरसाल दर शेकडा ९ टक्के व्याज द्यावे तसेच तक्रारीचा खर्च दहा हजार द्यावा आणि या आदेशाची पूर्तता सेंट्रल बँकेने 30 दिवसात करावी असे आदेशात म्हटले आहे .शेतकरी ग्राहकाच्या वतीने ज्येष्ठ ऍडव्होकेट सुरेश लगड एडवोकेट शारदा लगड यांनी काम पाहिले त्यांना एडवोकेट सुजाता बोडके , एडवोकेट विराज लगड एडवोकेट प्रतीक्षा मंगलराम यांनी सहाय्य केले.