महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधा निर्माण करत असल्याचा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यासोबत डाव्या पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीने 22 एप्रिलला राज्यभरात जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत . मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ,भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष ,लाल निशाण पक्ष यासह इतर समविचारी पक्षाच्या आंदोलनात सहभागी होतील.
मुंबई इथे या संदर्भात बैठक घेण्यात आलेली असून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी हे अध्यक्षस्थानी होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव एडवोकेट सुभाष लांडे यांनी या विषयावर बोलताना ,’ सत्तेला विरोध करणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबणारे आणि जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे हे विधेयक आहे त्यामुळे हे विधेयक रद्द करावे यासाठी राज्यव्यापी लढा उभारण्यात येणार आहे .’ असे सांगण्यात आलेले आहे.
एडवोकेट सुभाष लांडे पुढे म्हणाले की ,’ तालुक्याच्या ठिकाणी तसेच शहरातील जिल्ह्याच्या ठिकाणी 22 एप्रिलला तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होणार असून सर्व डाव्या आणि लोकशाहीवादी पक्ष संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक पास झाले तर विरोधकांचा आवाज दाबून कॉर्पोरेट धार्जिणे धोरण राबवून महाराष्ट्रात हुकूमशाही आणण्याच्या प्रयत्नात हे सरकार आहे. पुरोगामी महाराष्ट्र हा प्रकार कदापि सहन करणार नाही त्यामुळे या विधेयकाला विरोध करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक विरोधी समिती स्थापन करून कृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे ,’ असेही ते पुढे म्हणाले.