नगर जिल्ह्यात रक्ताच्या थारोळ्यात संपूर्ण कुटुंबीय , दोघांचा मृत्यू तर महिला गंभीर 

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक धक्कादायक अशी घटना समोर आलेली असून कोपरगाव तालुक्यातील काकडी शिवारातील दिघे वस्तीवर चोरीच्या उद्देशाने हल्ला करत दोन जणांची हत्या करण्यात आलेली आहे. मयत व्यक्तींमध्ये बापलेकाचा समावेश आहे.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या बारा तासांच्या आत आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत. 

उपलब्ध माहितीनुसार , साहेबराव पोपट भोसले ( वय साठ वर्ष ) व त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले ( वय 35 वर्ष ) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे असून साखरबाई साहेबराव भोसले या गंभीर जखमी झालेले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाठीमागच्या बाजूला भोसले कुटुंबीय राहत असून शनिवारी नेहमीप्रमाणे दूध घालण्यासाठी म्हणून दूधवाला आल्यानंतर हा प्रकार समोर आला. घराच्या बाहेर पडवीतच कृष्णा भोसले रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला तर साखराबाई भोसले यादेखील गंभीर जखमी झालेल्या होत्या आणि साहेबराव हे देखील जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. सर्वांना तात्काळ लोणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले मात्र बापलेकाचा मृत्यू झाला तर साखरबाई यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या बारा तासांच्या आत दोन जणांना अटक केलेली असून संदीप रामदास दहापाढ (वय अठरा वर्ष ) आणि जगन काशिनाथ किरकिरे ( वय पंचवीस वर्ष दोघेही राहणार तेलिंबपाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर ) अशी आरोपींची नावे आहेत. चोरीच्या उद्देशाने त्यांनी ही हत्या केल्याचे तपासात उघड झालेले आहे. 


शेअर करा